३० वर्षांपासून झोपडीतच जीवन गोळेगावच्या आदिवासी कुटुंबांचे घरकुल स्वप्न अजूनही अपुरे”
पावसाळ्यात छपरातून गळती, उन्हाळ्यात उकाडा, हिवाळ्यात गोठणारी थंडी – शासनाने तातडीने सर्वेक्षण करून पक्के घरकुल द्यावे, ग्रामस्थांची मागणी"

आलेगाव:-
गोळेगाव येथील कुसुम रामेश्वर कोल्हे यांचे कुटुंब गेली ३० वर्षे कच्च्या झोपडीतच दिवस काढत आहे. पावसाळ्यात झोपडीतून पाणी झिरपते, उन्हाळ्यात उकाडा असह्य होतो, तर हिवाळ्यात थंडीने अंग गोठते. स्वतःची शेती नाही, रोजगार नाही, आणि घरकुल योजनेत नावही नाही. शासनाकडून दरवर्षी लाखो-कोट्यवधी निधी येतो, योजनांच्या जाहिराती झळकतात, पण या कुटुंबाचे घरकुलाचे स्वप्न मात्र अद्याप अपुरेच आहे. ग्रामपंचायत व आदिवासी विभागाकडून कोणतेही मार्गदर्शन झालेले नाही. कोल्हे कुटुंबासह गावातील आदिवासी बांधव आजही योजनांच्या प्रतीक्षेत आहेत आणि शासनाने यावर तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
आलेगाव ग्रामपंचायत अंतर्गत गोळेगाव येथे अनेक आदिवासी बांधव राहतात. बहुसंख्य कुटुंबे भूमिहीन असून त्यांच्या जगण्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. कुसुम रामेश्वर कोल्हे यांचे कुटुंब याचे जिवंत उदाहरण आहे. तीन दशकांपासून त्यांनी झोपडीत जीवन कंठले आहे. कधी कधी छपरावर टिनपत्रेही नसतात, पावसाळ्यात छपरातून पाणी गळते, लहान मुले, वृद्ध मंडळी यांना आजारपणाला तोंड द्यावे लागते. गावातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, शासनाकडून दरवर्षी आदिवासी उपयोजनेतून मोठा निधी येतो, घरकुल योजनेच्या यादीत नावे लागतात, पण प्रत्यक्षात गरजूंपर्यंत हा लाभ पोहोचत नाही. “प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग, अकोला यांनी आजवर गावाला भेट दिलेली नाही. गावातील लोकांना प्रकल्प अधिकारी कोण आहेत हे सुद्धा माहिती नाही,” अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शासनाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्ष गरजूंना लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी केली आहे. विशेषतः गोळेगाव व आलेगाव येथील सर्व आदिवासी कुटुंबांचे त्वरित सर्वेक्षण करून घरकुल, रोजगार हमी, शिष्यवृत्ती, आरोग्य सुविधा यांचे वितरण प्राधान्याने करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावकऱ्यांच्या मते, शासनाने प्रकल्प अधिकाऱ्यांना तातडीने गावाला भेट देण्याचे आदेश द्यावेत, परिस्थिती पाहून ठोस निर्णय घ्यावा आणि ३० वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कोल्हे कुटुंबाला पक्के घर मिळवून द्यावे.
दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या चार कुटुंबांना शेवटी गावाबाहेरच्या शिवटेकडी डोंगरावर आश्रय घ्यावा लागला. त्यांनी स्वतःच्या हाताने कुडाचे आणि मातीचे छोटे घर बांधून कशीबशी निवारा उभारला आहे. डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे पिण्याचे पाणी आणण्यासाठी दररोज मोठ्या अंतरावरून पाणी भरून आणावे लागते. उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक भासते आणि लहान मुले, महिला यांना त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या घरकुल योजनेत नाव न आल्यामुळे हे कुटुंब आजही असुरक्षित झोपड्यांत जगत आहे. ग्रामस्थांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
“मी आलेगाव येथेच कायमस्वरूपी राहते, माझे माहेरही आलेगावचेच आहे. अनेक वर्षे येथे राहूनही आजतागायत आमच्याकडे स्वतःचे घर नाही. आम्ही टेकडीवर, डोंगरावर राहतो. ना पक्की जागा आहे, ना घराला धार आहे. पाणी आणण्यासाठी दररोज डोंगर उतरावा लागतो, मुलाबाळांसह जगणे कठीण झाले आहे. आम्ही कुळा-मातीच्या घरात राहतो, वारा आला की घर उडून जाण्याची भीती वाटते. आमच्या सारख्या कुटुंबांना शासनाने तातडीने जागा नियमित करून पक्के घरकुल द्यावे, हीच आमची अपेक्षा.”
संगीता मिथुन कानडे
आजवर आम्हाला आदिवासी विभागाकडून कोणतीही योजना लाभली नाही. एवढेच नव्हे तर विभागाचे कार्यालय कुठे आहे हे देखील आम्हाला माहित नाही. आम्हाला कोणीही मार्गदर्शन केलेले नाही. घरकुल योजनेसाठी आम्ही अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालय गाठले, मागणी अर्ज दिले, परंतु अद्याप आम्हाला घरकुल मिळालेले नाही. पावसाळ्यात ओलसर घरात मुलाबाळांसह राहणे कठीण झाले आहे. शासनाने आम्हाला तातडीने घरकुल द्यावे हीच आमची विनंती.”
कुसुम रामेश्वर कोल्हे, गोळेगाव
“सध्या घरकुल योजनेचे उद्दिष्ट उपलब्ध नाही. ऑक्टोबर २०२५ पर्यंत नवीन उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. आदिवासी विकास विभागामार्फत विविध शासकीय योजना जसे की शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार, आरोग्य सुविधा, अनुदानित शैक्षणिक साहित्य वितरण इत्यादी योजना नियमितपणे राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आमच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. सर्व अर्ज नियमानुसार तपासून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने योजना लाभ मिळवून दिला जाईल.”
मोहन व्यवहारे
प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, अकोला





